सद्गुरू चंद्रकांत अनंत भोसेकर
सद्गुरू चंद्रकांत अनंत भोसेकर
“सद्गुरू चंद्रकांत अनंत भोसेकर” एक असं व्यक्तिमत्व कि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला कृतकृत्य वाटावं. अतिशय साधी राहणी आणि तितकीच मधुर वाणी. विषय कुठलाही असो, तो समजावून सांगण्याची त्यांची हातोटी काही निराळीच होती. कुठलाही हव्यास नाही, पण जे काही करायचं ते मनापासून असा त्याच्या स्वभाव. “जे जे आपणा ठावे ते ते इतरां शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन” एवढीच खरंतर इच्छा. थोर संत यशवंतराव देव मामलेदार महाराज यांच्या कुळात जन्मल्यावर हे असं व्यक्तिमत्व असणं स्वाभाविकच आहे. वडील डॉक्टर अनंत गणेश भोसेकर (कीर्तनकार) व मातोश्री लक्ष्मीबाई अनंत भोसेकर यांच्या पोटी ४ जुलै १९३२ रोजी दादर (मुंबई) येथे त्यांचा जन्म झाला. १९६४ पर्यंत त्यांचं वास्तव्य शीव (मुंबई) येथे होतं. सौ सुनेत्रा भोसेकर (माहेरच्या विमल देवधर) यांच्याशी विवाह झाल्यावर दोन मुली व एक मुलगा यांचेसह ते डोंबिवलीत वास्तव्यास आले व अखेरपर्यंत ते डोंबिवलीचे रहिवासी होते. रिझर्व बँकेमध्ये १९९० साली असिस्टन्ट चीफ ऑफिसर या पदावरून ते निवृत्त झाले.
जे जे आपल्या आयुष्यामध्ये घडतं ते सर्व पूर्वनियोजित ईश्वरी संकल्पानुसारच घडत असतं या वर त्यांचा ठाम विश्वास होता. १९७० साली दसऱ्याच्या दिवशी त्यांना योगीराज सद्गुरू गुळवणी महाराज यांची शक्तिपाताची दीक्षा झाली, हि त्यांच्या आयुष्याला संपूर्णपणे कलाटणी देणारी गोष्ट होती. अंतर्बाह्य बदल होणे म्हणजे काय हे त्यांनी त्यावेळी अनुभवलं. गुळवणी महाराजांच्या कृपेने पुढे ते स्वतः हि शक्तिपाताची दीक्षा देऊ लागले. देशात आणि परदेशीही त्यांचे अनेक अनुग्रहित आहेत.
सद्गुरू चंद्रकांत अनंत भोसेकर हे नाव फक्त आध्यत्मिक गुरु म्हणूनच घेतलं जातं असं नाही तर ते अनेकांचे संगीतातील गुरु होते, अनेकांचे ते गणिताचे व इतर शालेय विषयांचे गुरु होते. ते स्वतः संवादिनी (हार्मोनियम) व बासरी अतिशय उत्तम वाजवत असत. संवादिनी ते बालपणापासून लीलया वाजवत असत तर बासरी ते साक्षात पंडित पन्नालाल घोष यांचेकडून शिकले. मनातील रामभक्तीमुळे गीत रामायण हा त्यांचा अतिशय प्रिय असा विषय होता. निवृत्ती नंतर चा पूर्ण वेळ त्यांनी ज्ञानदाना मध्ये व्यतीत केला. त्यांनी संगीतातील विद्यार्थ्यांसाठी “स्वर-संस्कार” नावाची संस्था काढली ज्यामध्ये विद्यार्थी आपली संगीत शिकण्याची इच्छा विनामूल्य पूर्ण करू शकत होता. दिवसभरामध्ये १२५ हुन अधिक विद्यार्थी त्यांचे कडून थोड्यावेळ का होईना संगीताचे ज्ञान घेऊन जात असत. “विद्यार्थी देवो भव” हे या संस्थेचे घोषवाक्य आहे.
अध्यात्मिक प्रगतीचा भाग म्हणून कुंडलिनी शक्तिमातेने त्यांच्याकडून अनेक अध्यात्मिक पुस्तके लिहून घेतली ज्याची सुरुवात ज्ञानेश्वरीवर आधारित “ज्ञानेश्वरी पारिजात” या प्रतिदिनी एक पृष्ठ या प्रमाणे ३६५ दिवसांमध्ये वाचून होईल व तरुणांसह कुणालाही सहज समजेल अशा अतिशय सोप्या मराठी भाषेमधील पुस्तकाने झाली. त्यानंतर त्यांनी अनेक अध्यात्मिक विषयांवरील पुस्तके लिहिली. सद्गुरूंचा इह लोकातील प्रवास जरी १३ जानेवारी २००६ रोजी संपला असला तरी त्यांनी लिहिलेली बहुतेक पुस्तके या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे जेणे करून सर्व पुस्तके आपणास विनामूल्य वाचावयास मिळतील व त्यानिमित्ताने सद्गुरूंचा ज्ञानमय सहवास आपणास लाभावा हि सद्गुरुंचे चरणी इच्छा व्यक्त करतो.